Tuesday 12 August 2008

परमसखा मृत्यू : किती आळवावा...

परमसखा मृत्यू : किती आळवावा....

"तुला अगदी शंभरावर पाच वर्षे आयुष्य!" मैत्रिणींच्या संमेलनात पोचायला मला थोडा उशीर झाला काय अन सगळ्यांनी हे असे उस्फुर्त स्वागत केले माझे. ऐकले अन अंगावर सरसरुन काटा आला. मनात म्हटले, माणसाची ' अधिकाची भूक कधी संपणारच नाही आहे का? पूर्वी नाव काढताच हजर होणा-याला शंभर वर्षे आयुष्य बहाल केले जायचे, आता शंभरावर पाच!' साहजिकच चर्चा या शंभरावर पाच आणि त्यावरुन अंगावर उठणारा काटा अशीच सुरु राहिली.

नुकतीच वयाची ११७ वर्षे पूर्ण केलेल्या रांगडया शेतकरी माणसाविषयी बातमी वाचली. त्यावरुन आपल्या पुराणकथांमधील सात चिरंजीवांची आठवण झाली. अमरत्वाची कल्पना खरोखरच एवढी आकर्षक आहे का! असली तर का! या सात चिरंजीवांच्या कल्पनेबाबत दुर्गाबाई भागवतांनी म्हटलंय, ``माणसाला अमर होण्याची नैसर्गिक इच्छा असते. पण चिरंजीव झाल्यावर त्याला नैसर्गिक अंकूर फुटणार नाहीत. ते अमरत्व प्रवाही नसणार. ते अमरत्व कोमेजणार नाही पण ते फुलणार, फळणारही नाही, असाच इशारा, दयायचा असावा.``

मृत्यूविषयी माणसाला जेवढी भीती आहे तेवढंच आकर्षणही आहे. ११७ वर्षांच्या माणसाची बातमी जरी पेपरमध्ये छापून येण्याएवढी महत्वाची वाटली तरी बहुतेक वृध्दांशी चर्चा केली तर त्यांची प्रतिक्रिया ``नकोरे बाबा एवढं लांबलचक आयुष्य!`` अशीच असते.

जगातील बहुतेक धर्मांनी आत्महत्या हे पाप मानलं आहे. या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वर, सावरकर, सानेगुरूजी यांसारख्या आपल्या परिचयातील उदाहरणांमधील एक प्रकारच्या आत्महत्यांनाच आपल्याकडे उच्चतर दर्जा दिलेला आहे. हा किती मोठा विरोधाभास आहे? ख््रािश्चॅनिटीचा पाया असणाऱ्या जेनेसिस नुसार मानवी जगातील पहिला मत्यू हा नैसर्गिक मत्यू नव्हताच. अॅडम आणि आिव्ह यांच्या केन आणि एबल या दोन भावाभावातील वैरातून केन हा एबलचा द्वेष करतो आणि रागाच्या भरात तो त्याला मारुनच टाकतो. ख््रािश्चॅनिटीनुसार हा जगातला पहिला मानवी मत्यू!

निसर्गाकडे पाहिलं तर काय दिसते? जिवितकार्य पूर्ण झाले की मत्यू! कोणा किटकाचा तीन दिवसात तर एखादया केळीचा प्रसवतांनाच! जन्म, वाढ, पुनरूत्पादन आणि विनाश ही खरं तर निसर्गाचीच साखळी आहे. पण मानवाने प्रगतीच्या नशेत या साखळीला खोडा घातला आहे. अर्थात काळाची पावलं उलटी कधीच जाउ शकणार नाहीत. काळाच्या सुरूवातीच्या पावलांत माणसाने जन्म घेण्याच्या नैसर्गिक हक्कात हस्तक्षेप केलेला आहेच पण मत्यू पावण्याच्या नैसर्गिक हक्कात मात्र तो हस्तक्षेप करण्यास कचरतो आहे, हे काय आहे?

वास्तविक फक्त भारतीय परंपरांचा विचार केला तरी समाजाचं कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात नेतत्व करणाऱ्यांनी नैसर्गिक मत्यूवर अवलंबून राहणं नाकारलेलंच दिसते. `अनादि मी अनंत मी। अवध्य मी भला ।` असं बजावणाऱ्या सावरकरांनी शेवटी वयाच्या ८३व्या वर्पी निर्धारपूर्वक अन्नत्याग करून मत्यूला मिठी मारली. त्यापूर्वी अंदमान बेटावर काळया पाण्याची शिक्षा भोगताना त्यांनी जे मनोबल दाखवले होते, त्याहून हे मनोबल निश्चितच तसूभरही कमी नव्हते. ज्ञानेश्वरांनी तर अगदी लहान वयात कृतार्थ मत्यू पत्करला तो समाधीच्या मार्गाने. पाश्चात्यांमध्येही सॊक्रेटिसने विष पिउन मृत्यु पत्करला तो पलायनवाद नाकारण्यासाठी. हॆम्लॊक हे विष पिउन तो अगदी स्थिर बुद्धीने मृत्युला सामोरा गेला. हा सगळा इतिहास काय सांगतो? अनैसर्गिक मरणाला पुर्वी मानवी समाजात मान्यताच नव्हे, तर प्रतिष्ठा ही होती. फक्त कायद्याचे पाठबळ नव्हते आणि ते अजुनहि नाही.आणि अशा त-हेच्या स्वयंनिर्णयासाठी फार मोठ्या मानसिक बळाची गरज असते. जे सामान्य माणसाजवळ अभावानेच आढळते; आणि कोणतीही कठीण गोष्ट एकटादुकटा जेव्हा करु शकत नाही तेव्हा एकमेकांच्या सहकार्यांने ती पार पाडणे थोडेतरी सुलभ होते, ही गोष्ट सर्वमान्य आहे. त्यामुळेच आज इच्छामरणाच्या कायद्याची जास्त गरज निर्माण झाली आहे. कारण एकमेकांना ज्या गोष्टीत मदत करायला जायचे ती गोष्ट तर आधी कायदेशीर असली पाहिजे. इच्छामरणाबाबत अनेकांनी वैयक्तिक पातळीवर ही गरज मान्य केलेली आहे. या पुर्वी आ. सु.च्या अंकात माझ्या प्रसिद्ध झालेल्या पत्रास पाठींबा देणारे दुरध्वनी अनेक मान्यवरांनी केलेले आहेत. खाजगी बैठकांमध्ये तर अनेकांनी 'इच्छामरणाची सोय असायला हवी' हे मान्यच केलेले आहे. या ही पुढे जाउन या विषयावर कोणी जनहित याचिका दाखल करणार असेल तर त्याला मी वैयक्तिकरित्या आर्थिक मदत ( रु १०,०००/-) करेन असे ही कळविले गेले.

याबाबत पुन्हा दुर्गाबाई भागवतांचाच दाखला आहे. एका मुलाखतीत म्हणले आहे," आत्महत्या हे पाप आहे असे अनेक धर्मांनी ठरवलले आहे खरे, पण मला काही ते पटत नाही . ज्याच्या नशीबाला असह्य शारिरीक वेदना आहेत; ज्याच्या मानसिक भौतिक संवेदनांचा अंतच झालेला आहे, किंवा ज्याचं जगुन संपल आहे त्याला जर सुटका हवी असेल, तर त्याला लोळत घोळत दीनवाणे मरण येण्यापेक्षा, सन्मानाने विनायातना चटकन मरण येणं हा त्याचा हक्क आहे असे मी मानते. असं मरण सुखाने येईल याची व्यवस्था करायला हवी. आत्महत्या म्हणण्यापेक्षा त्याला इच्छामरण हा शब्द अधिक योग्य. सावकरांचे मरण हे इच्छामरण होते. अशा मरणासाठी एक चळवळ चालवण्याची गरज आहे म्हणजे अन्नत्याग करुन मरण्याची वेळ लोकांवर येणार नाही."

अर्थात आक्षेप घेणा-यांजवळ पुष्कळ मुद्दे आहेत. भारतासारख्या देशात जिथे एका सिगरेट साठी आजीचा जीव घेणारे नातू आहेत, तिथे इच्छामरणाचा कायदा झाला तर लोकांना मोकळे रानच मिळेल. कायद्याच आधार घेउन घरातील वृद्धांचे सरसहा खुन पडु लागतील. वैद्यकीय पेशात भ्रष्टाचार माजेल. इ... शिवाय ज्याला खरोखरच मरायचयं त्याला कायद्याची काय गरज? हा तर विरोधकांच्या हातातील फार मोठा मुद्दा आहे. पण कायदा एवढ्यासाठी हवा आहे कि आयुष्यभर आम्ही कायदेशीरपणे जगतो, संपत्ती मिळवतो,तिचा उपभोग घेतो, तिचे दान करतो, मग अशा या प्रतिष्ठीत आयुष्याच्या शेवटीच आम्ही आत्महत्या करुन बेकायदा कृत्य का करावे?

कायद्याच्या आवश्यकतेबाबत तांत्रिक मुद्दे तर अनेक आहेत. वैद्यकिय तज्ञ मंडळी हे मुद्दे नक्कीच अधिक विस्ताराने मांडू शकतील. पण समजा अगदी माझ्या सारख्या चाळिस बेचाळीस वयाच्या बाईने तिच्या वृद्धापकाळासाठी असा इच्छामरणाचा निर्णय करुन ठेवला असला तरी तेव्हा तो अमलात आणण्यासाठी माझी शारिरीक स्थिती असेलच याची काय शाश्वती? वृद्धापकाळात साध्या दैनंदिन कृतींसाठीसुद्धा दुस-याची मदत घ्यावी लागते हे आपण हरघडी पाहतोच आहोत ना? मग इच्छामरणासारखा निर्णय अमलात आणण्याजोगी माझी शारिरीक स्थिती राहिल अस मी मानणं हा केवढा मुर्खपणा! म्हणुनच येथे मदतीची गरज आहे. ती जास्तीत जास्त सुरक्षीत कशी असेल याचा विचार नंतर करता येईल.

ही सर्व कहाणी स्वाभाविकपणेच जोडली जाते ती नियोजनाशी! जर भविष्यात मी कायम स्वावलंबीच राहणार आहे तर मला 'म्हातारपणची काठी' लागणारच नाही. मग माझ मूल मी जास्त निरपेक्षपणे, जबाबदारीच ओझ त्याच्यावर न लादता वाढ्वू शकेन. त्याचा विकास अधिक खुलेपणाने होउ शकेल. बालवयाच्या माझ्या परावलंबित्वाकडून, स्वावलंबित्वाकडे झालेला माझा प्रवास तिथेच पुर्णविराम पावेल. त्याला पुन्हा परावलंबित्वाची भीती उरणारच नाही या ठीकाणी अर्थातच माझ्या आर्थिक, मानसिक, शारिरिक जगण्याचा विकास उर्ध्वगामीच राहील. शिवाय या त-हेने वृद्धांची संख्या आपोआप नियंत्रित राहू लागली तर जागतिक अर्थकारणावर काय परिणाम होतील हे अर्थतज्ञांनी जरुर सांगावे.

एका अर्थाने, आपण माणुस म्हणुन जन्मलो हे आपले भाग्यच म्हटले पाहिजे.'रिटायर्ड लाईफ' ही संकल्पना फक्त मानव जातीतच आहे. अवती भवती जरा बघितले तर काय दिसते? ज्यावेळी प्राणी अन्न मिळवण्याची धडपड थांबवतो तेव्हाच त्याचा मृत्यु नक्की होतो. जेव्हा वनस्पतींची मूळं पाणी शोषण थांबवतात तेव्हा तिला नष्ट व्हावेच लागते. शत्रुपासून पळण्याची प्रेरणा आणि शक्ती संपली कि जिवाचा नाश अटळ रहातो. म्हणजेच अन्न व संरक्षण या दोन मूलभुत गोष्टींसाठी संघर्ष करण्याची ताकद संपली की निसर्गत:च त्या जीवाचा अंत होतो. यात कुठे 'रिटायर्ड लाइफ' आहे ? पण प्रगत मानवी समाजात काय आहे- पस्तीस वर्षे नोकरी करा आणि पंचेचाळीस वर्षे पेन्शन खा! हे लिहिणं कदाचित काही लोकांना फार क्रूरपणाचे वाटेल. पण ते सत्य आहे. उमेदीची निम्मी वर्षे माणूस म्हातारपणाची तरतूद करण्यात घालवतो आणि निम्मी वर्षे सेटल होण्यात. अर्थात हे थोडे विषयांतर झाले. पण मथितार्थ एवढाच की जेव्हा 'जनना' त माणसाने हस्तक्षेप केला तेव्हाच 'मरणा'तही तो करावा लागणार हे अटळ होते.

प्रगत शहरी समाजापुरतं निरिक्षण नोंदवायचे झाले तर, आसन्न मरण स्थितीतील रोग्यांचे प्राणवायु पुरवठा करणारे यंत्र चालू ठेवायचे कि नाही याचा निर्णय तुम्हीच घ्या, असं नातेवाईकांना सांगणारी डॊक्टर मंडळी वेगळे काय करीत आहेत? 'तेरी भी चुप मेरी भी चुप!' असा कायदा व्यवहारात वापरात आहे. आणि या प्रकरणाचे भरत वाक्य ठरलेलं आहे. "डॊक्टर म्हणालेच होते, असं ठेवुन काही सुधारणा होणार नाही. तुम्हाला निर्णय घ्यायलाच लागेल. काय करावे अगदी सुचतं नव्हते. पण एवढ्यातच ते गेले. अगदी अवघड जबाबदारीतून सोडवल बघा त्यांनी आम्हाला!"

शेवटी आपल्या माणसाचा हात हातात असताना मृत्यू येणे , एका अज्ञाताच्या प्रवासासाठी प्रस्थान ठेवायला मिळणे हे खरोखरच अहो भाग्य असणार. पण त्यासाठी स्वत:च स्वत:चा भाग्य विधाता व्हावे लागणार हे नक्की.! कारण असा रिझर्व्हेशनचा प्रवास नियोजनाशिवाय करायला मिळणे अशक्यच की.

'पुरेसे जगून झाल्यावर' मरणाचा हक्क जर माणसाला मिळाला तर नक्कीच त्याला आहे ते जगण अधिक हवसे वाटेल. ते अर्थपुर्ण करण्यासाठी तो अधिक धडपडेल. मृत्युची किंबहुना विनासायास मृत्यूची शाश्वती त्याच्या जगण्याला एक सकारात्मक बळ देईल.

डी -२०२, कपिल अभिजात, डहाणूकर कॊलनी, कोथरुड, पुणे ४११०३८.
संपर्क: ९४२२३०२२८७

[ लेखिका 'मृत्यु: स्वाधीन की पराधीन' या विषयाच्या सामाजिक, भावनिक, आर्थिक, जीवशास्त्रीय अशा अंगाने चर्चा व्हावी, असे सुचवतात. इच्छुकांचे लेख संपादित करुन छापले जातील.- सं.]